पुरंदर प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे घडलेल्या एका हृद्यस्पर्शी घटनेने समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे. वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एका लेकीने धैर्याने अंत्यविधीची जबाबदारी स्वतः स्वीकारत ‘लेकच खरा आधार’ असल्याचे कृतीतून सिद्ध करून दाखवले.
कर्नलवाडी येथील रहिवासी सुभाष दादासाहेब निगडे यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलती एक मुलगी उत्कर्षा असा परिवार आहे. वडिलांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही उत्कर्षाने धैर्य न हरवता स्वतः अंत्यविधी करण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला.
परंपरेनुसार हिंदू धर्मात अंत्यविधीची जबाबदारी मुलाकडे दिली जाते. मात्र निगडे कुटुंबीयांनी ही परंपरा मोडत मुलगीच वडिलांचा अंत्यविधी करणार असा निर्णय घेत समाजासमोर नवा विचार मांडला. या कृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी आणि ठोस संदेश देण्यात आला.
बारामती येथील वैकुंठ स्मशानभूमीत उत्कर्षाने अत्यंत संयमाने सर्व विधी पूर्ण केले. “माझ्या वडिलांनी मला कधीच मुलापेक्षा कमी मानलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासात कर्तव्य पार पाडणं हा माझा हक्क आहे,” अशी भावना व्यक्त करत उत्कर्षाने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला.
उत्कर्षाच्या या निर्णयामागे तिच्या कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता. कठीण प्रसंगात मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कुटुंबानेही समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले. या घटनेमुळे अनेकांनी या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाला दिशा देणारी आहे. २१ व्या शतकात स्त्री-पुरुष समानता ही केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता ती कृतीतूनही दिसून यायला हवी, हे कर्नलवाडीच्या या लेकीने ठामपणे सिद्ध केले आहे.
कर्नलवाडीतील या घटनेने समाजात नवा विचार रुजवला असून ‘लेकच खरा आधार’ ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


0 Comments