सोमेश्वरनगर | निंबुत
सोमेश्वरनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवत असून तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. डाव्या कालव्याला पाणी उपलब्ध असतानाही परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता.
निंबूत गावात ग्रामपंचायतीच्या चार विहिरी आणि चार बोअरवेल असूनही तीव्र उष्णतेमुळे जलस्रोत आटू लागले. काही बोअरवेल केवळ काही तासच सुरू राहत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना हाती घेत विहिरींचा गाळ काढणे, आडवे बोअरवेल घेणे आदी कामांना गती दिली. उपसरपंच अमर काकडे, सदस्य नंदकुमार काकडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर, भाऊसो कोळेकर, राजेंद्र काकडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान, गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक धैर्यशील रमेश काकडे यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी गावासाठी दिलासादायक ठरली. ग्रामपंचायतीच्या विनंतीला प्रतिसाद देत त्यांनी स्वतःच्या शेतीचे पाणी बंद करून २४ तास सुरू असलेली बोअरवेल गावाच्या पिण्यासाठी उपलब्ध करून दिली.
या निर्णयामुळे निंबूत गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून ग्रामस्थांकडून धैर्यशील काकडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“स्वतःच्या पिकांपेक्षा गावकऱ्यांच्या तहानेला प्राधान्य देणं हीच खरी माणुसकी!”

0 Comments