धर्माबाद (प्रतिनिधी) : सोमेश स्वामी
येवती येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या वारंवार गैरहजेरीच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित मुख्याध्यापक सूर्यकांत महेंद्रकर हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि अधिकृत रजा न दाखल करता सातत्याने शाळेत अनुपस्थित राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात शिक्षण विभाग व संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती.
मात्र, तक्रारीनंतर प्रत्यक्ष चौकशी करण्याऐवजी केवळ कागदोपत्री हालचाली दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “चौकशीचे नाव मोठे, पण काम शून्य” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करण्यात आलेली नाही. शिक्षकांचे जबाब नोंदवले गेलेले नाहीत, तसेच विद्यार्थी व पालकांची मतेही विचारात घेतलेली नाहीत. त्यामुळे ही चौकशी केवळ दिखाऊ आणि बोगस स्वरूपाची असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.
मुख्याध्यापकांच्या सातत्याने गैरहजेरीमुळे शाळेतील शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. वार्षिक परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्ववत करावे, अशी मागणी तक्रारदार राजेश्वर भोजन्ना बल्पेवाड (रा. येवती, ता. धर्माबाद) यांनी केली आहे.

0 Comments