भोकर | सोमेश स्वामी
तालुक्यात गुटखा, मटका आणि जुगारावर पूर्णपणे आळा बसत नसतानाच आता भोकर पंचायत समिती कार्यालयातील भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचे चित्र समोर येत आहे. भ्रष्टाचारावर लगाम घालण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे भ्रष्ट घटकांचे ‘चांगभलं’ होत असताना सामान्य नागरिकांचे मात्र आर्थिक कंबरडे मोडत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विविध योजनांद्वारे खर्च केला जातो. मात्र या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या पंचायत समिती कार्यालयातच ‘दाम दिल्याशिवाय काम नाही’ असा अलिखित नियम रूढ झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परिणामी, गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीही ‘माया’ मोजावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
पंचायत समितीमध्ये अघोषित दरपत्रक आणि दलालांचा विळखा निर्माण झाल्याचेही समोर येत आहे. कोणतेही काम असो, संबंधित टेबलवर पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. काही कामांसाठी तर ठराविक ‘रेट’ निश्चित असल्याचे बोलले जात असून, खासगी मध्यस्थांशिवाय साधे कामही होणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पदरचे पैसे खर्च करून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या उक्तीप्रमाणे उघडपणे सुरू असलेला हा प्रकार गुप्तचर यंत्रणांच्या नजरेतून कसा सुटतो, असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारामुळे शासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असून, परिस्थिती गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


0 Comments