सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाच्या घटनेमुळे बारामती तालुक्यातील मौजे होळ येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व फक्त धार्मिक विधी पार पाडून साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ,ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.
राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यंदा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत एकमताने उत्सवातील जल्लोष टाळत यंदाच्या वर्षीची यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आतिषबाजी डीजे यांना फाटा देत रात्रीचा व दिवसाचा तमाशा व कुस्त्या रद्द करत ग्रामस्थांमध्ये श्रद्धा व परंपरा जपत संयमित वातावरणात देवाचा अभिषेक,लग्न विधी व पालखी मिरवणूक हे धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने होतील.
तसेच होळ गावातील वायाळ पट्टा येथील श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताची यात्रा ही रद्द करण्यात आली आहे.त्याच अनुषंगाने होळ कांबळे वस्ती येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीच्या महोत्सव निमित्ताने प्रतिमापूजन व महाप्रसाद हे उत्सवाचे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. परंतु मिरवणूक व ऑर्केस्ट्रा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.


0 Comments