BARAMATI | निंबुत येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी; आदर्श मिलिंद तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम.धार्मिक कार्यक्रम, पंचशील पठण व अन्नदानाने वातावरण भक्तिमय.

 

                              पुरंदर रिपोर्टर | Live

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी :

     निंबुत (ता. बारामती) येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने भगवान बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्त पोलिस निरीक्षक भानुदास बनसोडे व मायावती बनसोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.



यानंतर शशिकांत बनसोडे यांनी पंचशील व सुत्त पठण करून उपस्थितांना धम्माची शिकवण दिली. कार्यक्रमात प्रसाद सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना भगवान बुद्धांचे विचार समाजासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित केले. “भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे भगवान बुद्ध होय. त्यांनी सत्य, करुणा, समता आणि विवेकाचा मार्ग दाखवला,” असे ते म्हणाले.

तसेच, माजी सरपंच राजकुमार बनसोडे यांनी आपल्या भाषणात जीवनात नम्रता, मैत्री आणि विवेकाची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “अप्प दीपो भव — स्वतःच स्वतःचा प्रकाश बना,” हा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी मंडळाच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले, या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments