पुरंदर रिपोर्टर Live
निरा : प्रतिनिधी
श्री ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्वतंत्र विश्वस्त मंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला आता वादाचे स्वरूप प्राप्त झाले असून परस्परविरोधी दोन विश्वस्त समित्या समोर आल्याने गावात चर्चांना उधाण आले आहे. १२ एप्रिल रोजी ग्रामस्थ, भाविक व भक्तांच्या बैठकीत एकमताने २१ जणांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर या विश्वस्त मंडळाच्या स्थापनेचा प्रस्ताव ४ मे रोजी धर्मादाय कार्यालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संदीप सदाशिव निगडे यांनी दिली.
मात्र, या निवडीला विरोध दर्शवत १० मे रोजी काही ग्रामस्थांनी स्वतंत्र बैठक घेऊन नव्या विश्वस्त समितीची निवड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विश्वस्त निवडीचा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
संदीप निगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे २२ मार्च २०२६ रोजी देवस्थान ट्रस्ट स्थापनेचा विषय प्रथम चर्चेला आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहमतीने १० जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. पुढे २४ मार्च, ४ एप्रिल आणि १० एप्रिल रोजी बैठका घेण्यात आल्या. गावातील प्रत्येक वाड्यातून, मानकरी व बलुतेदारांमधून प्रतिनिधींची निवड करून त्यांचे स्वाक्षरीयुक्त अर्ज कोअर कमिटीकडे जमा करण्यात आले होते.
त्यानंतर १२ एप्रिल रोजी ज्योतिर्लिंग मंदिरात ग्रामस्थ, भाविक व भक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विश्वस्त व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ४ मे रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे ट्रस्ट स्थापनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे निगडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १० मे रोजी काही ग्रामस्थांनी मंदिरात स्वतंत्र बैठक घेत नव्या विश्वस्त समितीची निवड केली. या बैठकीला २२ जण उपस्थित होते. ही सभा अवघी एक मिनिट दहा सेकंद चालल्याचा दावा संदीप निगडे यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
लोकसहभागातून उभे राहिले देवस्थान; ट्रस्टची मात्र नोंद नाही.
गुळुंचे येथील प्रसिद्ध काटेबारस यात्रेसाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. लोकवर्गणी व लोकसहभागातून लाखो रुपये खर्च करून ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच शासनाकडून या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जाही प्राप्त झाला आहे. एवढे आर्थिकदृष्ट्या सक्षम देवस्थान असूनही आजपर्यंत धर्मादाय कार्यालयात ट्रस्टची अधिकृत नोंद नसल्याने नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

0 Comments