बारामती | प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून एकूण २१ गावांचा टंचाई घोषित करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी सहा गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले असून संबंधित गावांमध्ये टँकर सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिली.
पंचायत समितीमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांनुसार गाडीखेल, सोनवडी सुपे, देऊळगाव रसाळ, थोपटेवाडी आणि अंजनगाव या गावांचे टँकर प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तसेच कारखेल गावाचा प्रस्ताव सोमवारी मंजूर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंजूर झालेल्या गावांमध्ये उद्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
उर्वरित गावांमध्ये टंचाई जाहीर करण्यासाठीचे प्रस्ताव अद्याप प्रांत कार्यालयात प्रलंबित असून त्यांची पाहणी करून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमार्फत जिरायती भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाणी व जनावरांच्या पाण्याच्या गरजांबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
तसेच उर्वरित गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्यासाठी ग्रामसेवकांना निर्देश देण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत सभापती किरण तावरे जिरायती भागाचा दौरा करून पिण्याच्या पाणीपुरवठा व जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0 Comments