नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता. पुरंदर) येथील स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी व जनजीवन सुधारण्यासाठी करावा, अशी अपेक्षा जय माँ भवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धायगुडे यांनी व्यक्त केली.
जय माँ भवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक नगररचनाकारपदी निवड झालेले ओंकार महादेव लकडे तसेच मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक विकास कुंडलकर यांची सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फेटा, हार, शाल व श्रीफळ देऊन दोघांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी काकडे महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे, जेजुरीचे दादासाहेब पडळकर, व्हा. चेअरमन दिपक डागा, संचालक दिनेश गायकवाड, महेश शेंडगे, समीर सय्यद, अनिल मोटे, पुनम जेधे, सुनिल लकडे, सचिव दिपक शेळके, तेजस शेळके आदी उपस्थित होते.
संदीप धायगुडे म्हणाले की, अधिकारी होणे ही सोपी गोष्ट नसून त्यामागे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे कष्ट असतात. ओंकार लकडे यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश हे नीरा गावाची मान उंचावणारे आहे. भविष्यात क्लास वन अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
सत्काराला उत्तर देताना सहाय्यक नगररचनाकार ओंकार लकडे यांनी भविष्यात नीरा गाव पीएमआरडीएच्या हद्दीत आल्यास गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास कुंडलकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी चांगले अधिकारी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंकर जेधे यांनी मानले.


0 Comments