बारामती. प्रतिनिधी :
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील कन्या तथा आष्टी (जि. बीड) येथील अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापिका प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. शुभांगी खुडे यांनी "आत्मकथा लेखन की चुनौतियाँ और स्त्री प्रश्न (दलित स्त्री आत्मकथाकारों के विशेष संदर्भ में)" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या संशोधन कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हिंदी विषयात पीएचडी पदवी प्रदान केली.
विशेष म्हणजे, प्रा. शुभांगी खुडे यांचे पती आणि सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या हिंदी विभागात कार्यरत असलेले प्रा. पोपट जाधव यांनाही मागील आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिंदी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली होती.
एकाच आठवड्यात, एकाच विषयात आणि एकाच संशोधन केंद्रातून पती-पत्नीने पीएचडी पदवी संपादन केल्याने हा दुर्मीळ योग ठरला असून मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी आणि समाजातील विविध स्तरांतून या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयाच्या हिंदी विभागातील डॉ. नितीन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, माजी प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे, सचिव अतुलशेठ मेहेर, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 Comments