स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ किलो चांदीचा पाट संत सावता महाराजांच्या चरणी अर्पण.


पुरंदर रिपोर्टर Live

निरा | प्रतिनिधी

                 पाडेगाव (नीरा दत्त घाट) येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भव्य दिव्य कीर्तन महोत्सव तथा श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या भक्तिमय वातावरणात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री संतशिरोमणी सावता महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी २ किलो वजनाचा चांदीचा पाट अर्पण करण्यात आला.

                दि. २३ मे २०२६ रोजी आ. रोहित पवार यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री संतशिरोमणी सावता महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी, श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र अरण-भेंडी पालखी सोहळ्यात महाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ २ किलो वजनाचा चांदीचा पाट अर्पण करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अवघ्या एका दिवसात पूर्तता करण्यात आली.



                 आज दि. २४ मे २०२६ रोजी आमदार रोहित पवार व परिवाराच्या वतीने हा चांदीचा पाट ह.भ.प. माऊली महाराज कदम तसेच माजी सभापती, बांधकाम व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे, दत्ताजीराव चव्हाण यांच्या शुभहस्ते पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. दिलीप महाराज झगडे यांच्याकडे सर्व वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.

                यावेळी संपूर्ण परिसर हरिनामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला होता. वारकरी परंपरा, संतांविषयीची श्रद्धा आणि समाजसेवेची भावना यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात पाहायला मिळाला.

                 स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस वाहिलेली ही भक्तिमय आदरांजली उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्शून गेली. उपस्थित नागरिक, वारकरी आणि ग्रामस्थांनी आ. रोहित पवार यांच्या या भक्तिमय आणि सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments