Baramati । ९८% दिव्यांग रवींद्र गिरी यांच्या मदतीला धावल्या अनिता देवकर व तृप्ती देसाई; माणुसकीचा जिवंत झरा पुन्हा वाहू लागला!


पुरंदर रिपोर्टर. Live. 

सोमेश्वरनगर.  रमेश कदम.  

                   बारामती तालुक्यातील निंबूत येथील ९८ टक्के दिव्यांग रवींद्र गिरी यांचे आयुष्य गेल्या काही वर्षांपासून संकटांच्या गर्तेत अडकले आहे. आई व आजीच्या आजारपणाचा भार, बंद पडलेला उदरनिर्वाहाचा छोटासा व्यवसाय आणि पावसाच्या प्रत्येक सरीसोबत कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले मातीचे घर यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.

                 अखेर आपल्या व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्यानंतर त्यांच्या मदतीची हाक शांतीबन पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका अनिता देवकर आणि भूमाता ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यापर्यंत पोहोचली. परिस्थितीची माहिती मिळताच दोघींनीही तत्काळ मदतीचा हात पुढे करत रवींद्र यांच्या कुटुंबाला दिलासा दिला.



                 स्वतः निराधार, मतिमंद, वृद्ध आणि वंचित घटकांसाठी आयुष्य समर्पित केलेल्या अनिता देवकर यांनी रवींद्र यांच्या परिस्थितीची दखल घेत त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेतला. 

                  या मदतकार्यामध्ये 'होम मिनिस्टर' फेम अभिनेते क्रांती नाना माळेगावकर यांनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच सागर गवळी, डॉ. अभिषेक जगताप यांच्यासह पत्रकार विजय लकडे अशा अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यामुळे रवींद्र गिरी यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

                 रवींद्र यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करताना शांतीबनच्या टीमचे मन हेलावून गेले. ढासळलेले मातीचे घर, त्यावर टाकलेले प्लास्टिकचे आच्छादन आणि जगण्यासाठी सुरू असलेली संघर्षमय धडपड पाहून अनिता देवकर यांनी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांना मदतीचे आवाहन केले आहे.

                 "एका दिव्यांगाच्या डोळ्यातील अश्रू पुसूया आणि त्याच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उभे करूया. आज आपण मदतीचा हात दिला, तर उद्या देव आपल्यालाच भेटेल," अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली.

                   रवींद्र गिरी यांच्या पुनर्वसनासाठी आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, अनिता देवकर, तृप्ती देसाई आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व दात्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रवींद्र गिरी. सोमेश्वरनगर.  

फो.नं.  8888176052.

Post a Comment

0 Comments