Baramati ।शाळेत शिक्षण की धोकादायक काम? बारामतीत विद्यार्थ्यांकडून शिडीवर चढवून स्वच्छता; पालकांचा संताप शाळेत


पुरंदर रिपोर्टर Live

बारामती

           बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील 'श्री शिरसाई विद्यालयात' एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क शिडीवर चढवून इमारतीची स्वच्छता करायला लावल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

 नेमकी घटना काय?

            मिळालेल्या माहितीनुसार, श्री शिरसाई विद्यालयात काही विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी चढवून शाळेच्या इमारतीची स्वच्छता करण्यास सांगण्यात आले होते. या घटनेचे वृत्त समजताच पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र आक्षेप घेतला.

           शाळेत शिपाई आणि इतर स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असतानाही, अशा प्रकारे लहान विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून कामाला लावण्याची गरज काय होती? जर एखादा अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण?



संतप्त पालकांच्या प्रमुख मागण्या आणि भूमिका:

 १) विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य शिक्षण:विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे आहे, धोकादायक कामे करणे नाही.

 २) कर्मचाऱ्यांकडूनच कामे करून घ्या:शाळेतील स्वच्छतेची कामे केवळ नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जावीत.

 ३) सुरक्षिततेशी खेळ नको: शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा कोणताही प्रकार करू नये.



राजकीय व सामाजिक स्तरातून निषेध:

         या गंभीर प्रकारावर बहुजन समाज पार्टीचे बारामती विधानसभा सचिव प्रवीण युवराज शिंदेयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी जाऊन स्वच्छतेचे काम करावे लागले असेल, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? शाळा प्रशासनाने यावर तात्काळ उत्तर दिले पाहिजे."

प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यात:

            या संपूर्ण प्रकरणावर आणि पालकांनी केलेल्या गंभीर आरोपांवर 'श्री शिरसाई विद्यालय' प्रशासनाची कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments