Baramati । सदोबाची वाडी येथे शेतकऱ्यावर तरसाचा हल्ला


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर। रमेश कदम. ‌‌

             दोबाची वाडी (ता. बारामती) येथे दिनांक २६ जून रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर तरस या प्राण्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदोबाची वाडी (इनामवस्ती) येथील शेतकरी रामचंद्र मारुती होळकर हे दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. ते शेतात पाणी देत असतांना अचानक तरस या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात होळकर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. होळकर यांनी सांगितल्यानुसार ज्या वेळी तरसाने हल्ला केला त्यावेळी एका हाताला दगड लागल्याने होळकर यांनी या दगडाच्या सहाय्याने तरसाचा प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली. हल्ल्यात जखमी झालेल्या होळकर यांच्यावर मेडिकल कॉलेज बारामती येथे उपचार करण्यात आले. 



            तरसाने केलेल्या या हल्ल्याने सदोबाची वाडी व होळ या  परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. येथील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे रात्री - अपरात्री सुद्धा अनेकदा शेतकऱ्यांना शेतावर कामासाठी जावे लागते. 



            अनेक महिला सुद्धा शेतामध्ये खुरपणी व इतर शेत कामासाठी, मजुरी साठी जात असतात. मात्र आता दिवसा अशा पद्धतीने तरसाकडून झालेल्या या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या आक्रमक झालेल्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे ग्रामस्थांकडून होत आहे. 

जर मृत कोंबड्या अथवा मृत प्राणी उघड्यावर टाकले जात असतील तर ते खाण्यासाठी अशाप्रकारे वन्यजीव जाऊ शकतात, यासाठी लवकरच जनजागृती कार्यक्रम घेणार आहोत. अशा प्रकारची घटना सदर ठिकाणी घडण्याची ही पहिली वेळ आहे, त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवण्यात येणार आहे.  हल्ल्यातील जखमी व्यक्तीस आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून नुकसान भरपाई करून देण्यात येईल. सदर ठिकाणची परिस्थिती पाहून तसे निर्णय घेण्यात येतील.  -अश्विनी शिंदे , वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती

आता लागणीचा हंगाम चालू आहे, रात्र दिवस आम्हाला शेतात जावे लागते. त्या परिसरात फाॅरेस्ट व ओढा आहे, कडेला उसाचे क्षेत्र आहे. काही ठिकाणी मृत प्राणी टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी कोल्हे, लांडगे, तरस यांसारखे प्राणी आम्हाला या ठिकाणी निदर्शनास येत आहे. हे प्राणी या ठराविक भागातच फिरत असतात. घडलेल्या प्रकाराने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नयेत यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाय योजना कराव्यात.   - रवींद्रकुमार होळकर. (शेतकरी)

Post a Comment

0 Comments