निरा । प्रतिनिधी.
“मी कठीण परीस्थित संघर्ष करून मंत्री झालो. भविष्यात मी देशाचा पंतप्रधान होईन. माझ्या पक्षाशी आणि सर्व समाजाशी असलेली माझी निष्ठा मी सोडली नाही. माझं बालपण बकऱ्यामागं गेलं. लहानपणापासून मी ओव्या ऐकत आलो. धनगर समाजाच्या या ओव्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिल्या. त्या कुणी कधी लिहिल्या नाहीत. पण आता या ओव्या नव्या पिढीने घेतल्या नाहीत. त्यामुळे या काळाच्या पडद्याआड जातील अशी भिती होती. परंतु डॉ. प्रविण जोशी यांनी धनगरी स्त्रीओवीगीते साहित्यात अजरामर केली. एवढेच नाही तर त्यांनी त्यातील लोकतत्व शोधले. त्यांचे हे काम साहित्यिक आणि सामाजिक दृष्टीने प्रचंड महत्वाचे आहे. अनर्घ या संशोधन ग्रंथाने माणदेशी धनगरी ओव्यांचा वारसा अजरामर केला.” असे गौरवोद्गार माजी पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री तसेच रासपाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी काढले.
पाडेगाव (ता. फलटण) येथील शिक्षक, संशोधक, ग्रामीण लेखक, कवी डॉ. प्रविण जोशी यांच्या ‘अनर्घ’ आणि ‘संजय’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले त्यावेळी महादेव जानकर बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. देविदास वायदंडे, प्रा. कुंडलिक कदम, उपसरपंच राजेश काकडे, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, शेखर खरात, दत्ताआबा चव्हाण, कांचनदादा निगडे, संजय निगडे, प्रा. संतोष पिंगळे, निवेदिता देशमुख, सुरेश जगताप, संतोष निगडे आदी उपस्थित होते. माण तालुक्यातून ओवीकार महिला हजर होत्या. त्यांनी सादर केलेल्या ओव्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे म्हणाले, “आहे रे वर्गाने नाही रे वर्गाच्या कल्याणासाठी झटायला हवे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतर देखील शेतकरी, श्रमिक आणि उपेक्षित वर्गाचे प्रश्न सुटले नाहीत. समाजात दरी निर्माण होत असून जातीयवाद वाढत आहे. साहित्यिकांनी यावर परखडपणे लिहायला हवे. साहित्यिक व्यक्त होणे थांबले तर व्यवस्थेला प्रश्न विचारणार कोण ?”
अभ्यासक्रमात बदल हवा –
अभ्यासक्रमात साहित्याची निवड काळजीपूर्वक करायला हवी. ललित साहित्यातील तोच तो पणा आता नको आहे. काळ बदलतो आहे तशाच समस्या देखील बदलत आहेत. नवीन विचार पुढे यायला हवेत. डॉ. प्रविण जोशी यांसारखे लेखक सामाजिक समस्यांवर भाष्य करतात, समता, बंधुता, न्याय यासाठी लिहितात. अशा लेखकांच्या साहित्यकृतींचा समावेश अभ्यासक्रमात करा असे आग्रही प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच प्रा.डॉ.देविदास वायदंडे यांनी केले.
कांचन निगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत जोशी यांनी मानले.


0 Comments