Baramati । माहिती अधिकाराचा गैरवापर की खंडणीचा डाव? बारामतीत खळबळ.


पुरंदर रिपोर्टर  Live. 

बारामती  प्रतिनिधी.  

            माहितीचा अधिकार (RTI) हा शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी नागरिकांना देण्यात आलेला प्रभावी लोकशाही अधिकार मानला जातो. मात्र, याच अधिकाराचा गैरवापर करून एका ग्रामपंचायत सदस्याला बदनामीची भीती दाखवत तब्बल २० लाख रुपयांची आर्थिक मागणी केल्याचा गंभीर प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळकृष्ण हरिभाऊ हरीहर (रा. गुणवडी, ता. बारामती) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी आरोपीने विविध शासकीय कार्यालयांकडे अर्ज, तक्रारी व पाठपुरावा केला होता. त्यानंतर या प्रक्रियेचा आधार घेत संबंधित सदस्यावर दबाव निर्माण करण्यात आला. सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याची, गावातून बाहेर काढण्याची तसेच समाजात तोंड दाखविण्यास जागा ठेवणार नसल्याची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.



            तपासादरम्यान पोलिसांना संबंधित संभाषणांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्ट, फॉरेन्सिक प्रमाणपत्रे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब प्राप्त झाले आहेत. प्राथमिक पडताळणीत आर्थिक मागणी झाल्याचे दर्शविणारी सामग्री समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

              बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले की, उपलब्ध डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या प्रकरणात आरोपी व्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

               या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करत आहेत.

Post a Comment

0 Comments