Daund । पिस्तूलाचा धाक, मारहाण अन् तरुणीचे अपहरण; दौंडमधील घटनेने खळबळ


पुरंदर रिपोर्टर Live 

दौंड । प्रतिनिधी

          दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे घरात घुसून एका तरुणीचे कथित अपहरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तरुणीच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच घरातील सुमारे पाच लाख रुपयांहून अधिकची रोकड आणि सात तोळ्यांचे सोन्याचे गंठण घेऊन गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.



          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीला हडपसर येथील कमरुद्दीन मुकीम शेख हा काही दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर २ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी घरात घुसल्याचे सांगण्यात आले आहे.

          फिर्यादीनुसार, आरोपीने तरुणीला जबरदस्तीने बाहेर ओढत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुटुंबीयांनी विरोध केल्यावर त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आई-वडील आणि घरातील वृद्ध व्यक्तींना मारहाण व धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



          याचवेळी नर्सरी व्यवसायासाठी घरात ठेवलेली ५ लाख १ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सुमारे सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठण घेऊन आरोपी पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून तरुणीला घेऊन गेल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या घटनेत आरोपीला आणखी दोघांची साथ असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

         या प्रकरणी कमरुद्दीन मुकीम शेख व अन्य दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments