Pune । पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; आज सर्व शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.


पुरंदर रिपोर्टर  Live. 

पुणे, प्रतिनिधी 

               भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी सोमवार (दि. ६ जुलै) रोजी रेड अलर्ट जारी करत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार, दि. ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

             आदेशानुसार, पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवार, दि. ६ जुलै रोजी बंद राहतील. संभाव्य अतिवृष्टी आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



              तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

             दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे तसेच पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments