पुरंदर रिपोर्टर Live
निंबुत–विजय लकडे
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मोठा उद्योग नाही, फक्त एक छोटासा शेती व्यवसाय आणि त्यातून समाजकार्याची मोठी जाणीव – हे व्यक्तिमत्त्व म्हणजे निंबूतचे अशोक बनसोडे (वय ६७). सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस देखील एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
वाढदिवसानिमित्त त्यांनी निंबूत गावातील दहा आदर्श मातांना साडी-चोळी भेट देत सत्कार केला. हा सत्कार ज्येष्ठ ग्रामस्थ व महिलांच्या हस्ते पार पडला, ज्यामुळे कार्यक्रमाचा सामाजिक सन्मान अधिकच वाढला. या उपक्रमातून ‘वाढदिवस म्हणजे केवळ आपल्यासाठी नव्हे तर समाजासाठीही काही करता येतं’ हा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाला सोमेश्वरचे संचालक अभिजीत काकडे, बा. सा. काकडे विद्यालयाचे मानद सचिव मदन काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, माजी उपसरपंच उदय काकडे, विजय काकडे, गडदरवाढीचे माजी सरपंच भगवान गडदरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी तात्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
‘आदर्श मिलिंद तरुण मंडळ निंबूत’ या तरुण कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण आयोजनात मेहनत घेतली. कार्यक्रमात निंबुत व सोमेश्वर परिसरातील पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
गावातील महिला वर्ग आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांसाठी भोजन व्यवस्था देखील करण्यात आली होती.
तात्यांनी आपल्या भाषणात मिश्कील अंदाजात म्हटलं, "जर मी शंभर वर्ष जगलो, तर शंभर आदर्श महिलांचा साडी-चोळी देऊन सत्कार करीन..."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार मधुकर बनसोडे यांनी केले!
0 Comments