रुबी हॉल क्लिनिकमध्ये निवासी डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

 

                 पुरंदर रिपोर्टर Live 

पुणे | ९ जून २०२५

                      पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमधील रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या युवा निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय २८) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. ढोले पाटील रस्त्यावरील डॉक्टरांच्या वसतिगृहात राहणाऱ्या डॉ. व्होरा यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं.


श्याम व्होरा हे गुजरातमधील भावनगरचे रहिवासी होते. गेल्या वर्षभरापासून ते रुबी हॉलमध्ये रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते ‘दामोदर भवन’ या रुबी हॉलच्या डॉक्टरांसाठी असलेल्या वसतिगृहात इतर सहकाऱ्यांसोबत राहत होते.


रविवारी रात्री उशिरापर्यंत व्होरा यांची खोली बंद असल्यामुळे सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अनेक वेळा बेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉक्टर व्होरा यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.


घटनास्थळी पोलिसांना मोबाईलचा पासवर्ड लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. त्यामुळे मोबाईलमधून आत्महत्येपूर्वीचे संकेत अथवा वैयक्तिक टिपणी सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


या घटनेबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांनी सांगितले की, रात्री १२ वाजता रुबी हॉलच्या सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. डॉक्टरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास मोबाईल व अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे सुरू आहे.


सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थता अजूनही शमलेली नाही. त्यानंतर अल्पावधीतच सोलापुरातील एका शिकाऊ डॉक्टरानेही आत्महत्या केली होती. अशा पार्श्वभूमीवर पुण्यात घडलेली ही नवी घटना वैद्यकीय क्षेत्रातील तणावाचे भयावह चित्र समोर आणत आहे.


Post a Comment

0 Comments