पुणे :प्रतिनिधी
पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन हरिश्चंद्र सुर्वे (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव असून, या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सुर्वे हे खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते सध्या पत्नी आणि मुलीसह शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील नव्या इमारतीत वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी व मुलगी गावाला गेल्यामुळे ते घरी एकटेच होते. याच दरम्यान, शुक्रवारी (दि. ६ जून) दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुर्वे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments